पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
जाफ्राबाद तालुक्यातील वाढोणा तांडा येथील घटना
जाफ्राबाद/टेंभुर्णी/प्रतिनिधी
शाळा सुटल्यानंतर पाझर तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जाफ्राबाद तालुक्यातील वाढोणा तांडा येथे मंगळवारी (दि. १४) घडली. कुणाल कृष्णा आढे (वय १३ वर्ष) व ओम गणेशा आढे ( वय ११ वर्ष) असे मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे वाढोणा तांडा गावावर शोककळा पसरली.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, देऊळगाव राजा येथील शिवाजी विद्यालयात सातवी व पाचवीत शिकणाऱ्या कुणाल कृष्णा आडे व ओम गणेश आढे या विद्यार्थ्यांचे मंगळवारी शाळा सुटल्यानंतर अकरा वाजता घरी आले. त्यानंतर ते गावालगत असलेल्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेले. यावेळी तलावाच्या काठावरही काही मुले उभे होते. पाण्यात उतरलेले दोघेजण दिसत नसल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना देताच गावातील रमेश राठोड व इतर जणांनी तलावात उड्या घेऊन मुलांचा शोध घेतला. दोन्ही मुलांना तातडीने टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कॉन्स्टेबल संजय देशपांडे करीत आहेत.