पांदण रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष — शेतकऱ्यांचा संताप
आरेगाव (प्रतिनिधी)
तालुक्यातील पांदण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते महत्त्वाचे असून महसूल विभागात त्यांची नोंद असली तरी देखभालीअभावी अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
पावसाळ्यात तर या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, चिखल आणि पाण्याची डबकी निर्माण होऊन शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रोजगार हमी योजनेतून मातीकाम झाले असले तरी अनेक पांदण रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत झाले असून केवळ पायवाट म्हणून वापरले जात आहेत.
आरेगाव परिसरातील पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतातील उत्पादन वाहतूक करणे तसेच पिकांना भेट देणे ही कसरत ठरत आहे. “शासनाने आणि संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन या पांदण रस्त्यांची दुरुस्ती करून मुरूम टाकून नुतनीकरण करावे,” अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकरी बांधव व गौर सेनेचे पश्चिम यवतमाळ जिल्हाध्यक्ष जय राठोड यांनी केली आहे. तसेच त्यांनी हा प्रश्न उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडला आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, समस्या तातडीने न सोडविल्यास पुढील काळात आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल.
