दीपक मोरे यांची पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर निवड
भोकरदन (प्रतिनिधी): जनतेच्या आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण रुग्णालयातील सुविधा सुधारण्यासाठी घेतलेला निर्णय म्हणजेच जनतेच्या हिताचा विचार करणारा एक महत्वाचा उपक्रम ठरला आहे. आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांनी दीपक मोरे यांची पुन्हा एकदा ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीवर सदस्य म्हणून निवड करून योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी दिली आहे.
दीपक मोरे यांनी यापूर्वी रुग्णसेवा क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही पुनर्निवड करण्यात आली आहे. त्यांनी मागील कार्यकाळात ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी औषधोपचार, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य शिबिरे, तसेच आपत्कालीन सेवांमध्ये तत्पर मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवेचे उदाहरण घालून दिले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण रुग्णालयातील जुन्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नवीन रुग्णवाहिकेसाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांच्या या संवेदनशील कार्यशैलीमुळेच पुन्हा एकदा रुग्ण कल्याण समितीवर त्यांची निवड झाली असून, तालुकाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
दीपक मोरे हे नेहमीच समाजकार्याच्या अग्रभागी राहिले आहेत. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता “सेवा हीच साधना” या तत्त्वावर काम करणे ही त्यांची ओळख बनली आहे. रुग्णसेवेतून त्यांनी ग्रामीण भागात विश्वासार्हता निर्माण केली आहे.