भोकरदन पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे रॅकेट
उघडकीस आणले असून ७५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकलसह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे दुचाकी चोरांच्या टोळीचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भोकरदन शहरातील जैन मंदिर, बाजारपट्टी भागातून गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी एक मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १७२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश बाबुराव पाटील (वय ४२, रा. कळमसरा, ता. पाचोरा, जि. जळगाव) याच्याकडे चोरीची दुचाकी मिळून आल्याने जळगाव पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले होते. घटनेची माहिती मिळताच तपास अधिकारी प्रशांत उबाळे यांनी जळगाव येथे जाऊन आरोपीचा ताबा घेतला.सोमवारी, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी त्यास रीतसर अटक करण्यात आली. आरोपीची पोलीस कोठडी घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून चोरीच्या एकूण २ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातून मोटारसायकल चोरीचे एक मोठे रॅकेटच समोर आले असून, या टोळीत इतरही आरोपींचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, पो-लीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत उबाळे आणि अनिल गवळी यांनी केली आहे.
