भोकरदनमध्ये वाळू माफियांचा सुळसुळाट!
भोकरदन तालुक्यात अवैध वाळू उपशाचा धंदा दिवसेंदिवस बोकाळत चालला असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या कथित हप्तेखोरीमुळे संपूर्ण नदीपात्रांचे अक्षरशः खोदकाम होत असल्याचे चित्र आहे. तहसिलदार कार्यालयापासून मंडळ अधिकारी, तलाठी आणि स्थानिक पोलीस प्रशासनापर्यंत साखळी पद्धतीने माहिती गळती होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष बाब म्हणजे पथक निघताच माफियांना खबर मिळते हे तेवढेच नवल. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा महसूल किंवा पोलीस पथक अवैध वाळू तस्करांवर कारवाईसाठी रवाना होते, तेव्हाच पथकातीलच काही कथित हप्तेखोर अधिकारी वा कर्मचारी संबंधित वाळू माफियांना मोबाईलद्वारे माहिती देतात. परिणामी, पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सर्व ट्रॅक्टर, डंपर व यंत्रसामग्री गायब होते. यामुळे प्रत्यक्षात कारवाई शून्य ठरते, तर कागदोपत्री मात्र पेट्रोलिंग सुरू आहे असे दाखवले जाते. दरम्यान भोकरदन तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जेसीबी, ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असतो. स्थानिक नागरिक सांगतात की, आम्ही रात्रभर जागतो, पण पथकाला एकही वाहन हाती लागत नाही. कारण माहिती आधीच पोहोचलेली असते. नद्यांचा पर्यावरणीय ऱ्हास अतिरिक्त वाळू उपशामुळे होत असून नदीपात्रांची खोली अनियमित वाढली आहे. त्यामुळे पूल व बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी भूजल पातळीही घटत आहे. शेती व पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत असून तज्ज्ञांच्या मते अशा बेकायदेशीर उपशामुळे भविष्यात पूरस्थिती अधिक भीषण होऊ शकते. यावर कारवाई का होत नाही याचे कारण शोधल्यास मुख्य कारणे अशी समोर येत आहेत की,आतील माहिती गळती (इन्फॉर्मर साखळी) हप्तेखोरीचे कथित जाळे राजकीय दबाव वरिष्ठांकडून ठोस चौकशीचा अभाव नियमित रात्रीच्या गस्तीसाठी स्वतंत्र पथक नसणे यामुळेच कार्यवाहीचा पत्ता लागत नाही.
